Tuesday, April 24, 2012

मुलांना इंग्रजी मुळाक्षरे लिहायला कसे शिकवावे?

इंग्रजी भाषा हल्ली मुलांना प्री - प्रायमरी पासूनच शिकवतात. त्यात सुरुवातीला मुलांना standing लाइन, स्लीपिंग लाइन, अप लाइन, डाऊन लाइन असे करत हळू हळू मुळाक्षरे शिकवतात. अंक काढायला देखील याच मूळ रेषांचा वापर करून शिकवले जाते.
आता समजा A लिहायचा असेल तर मुलांना सांगितले जाते कि आधी एक अप लाइन काढा, नंतर डाऊन लाइन काढा आणि सर्वात शेवटी एक स्लीपिंग लाइन काढा. सगळीच मुळाक्षरे अशाच प्रकारे तुकड्या-तुकड्यात काढायला शिकवले जाते. यात कधी कधी मुले कशी गम्मत करू शकतात ते मला इथे नमूद करावेसे वाटते.
समजा आता Z लिहायचा आहे तर मुले अश्या प्रकारे ते लक्षात ठेवतात. एक स्लीपिंग लाइन, तिला समांतर अशी आणखी एक स्लीपिंग लाइन आणि त्यांना जोडणारी एक डाऊन लाइन. आता जर यात डाऊन लाइन ऐवजी मुलांनी अप लाइन काढली तर Z ची मिरर इमेज तयार होते.


हीच चूक इतर अनेक अक्षरांबाबत संभवते. J मध्ये डावीकडे वळायचे कि उजवीकडे हे विसरलं कि त्याची  मिरर इमेज तयार होते. हे झाले capital letters च्या बाबतीत. small  letters लिहिताना देखील हाच सगळा गोंधळ होऊ शकतो. कारण ती सुद्धा तुकड्या-तुकड्यात  शिकवली जातात. b आणि d मधला गोंधळ तर सर्वश्रुत  असेल. p आणि q  सुद्धा असे गोंधळात पाडतात. 

अर्थात, अश्या पद्धतीने शिकवण्यामागे हा उद्देश असतो कि मुलाला अक्षर कसे तयार होते ते नीट समजावे आणि व्यवस्थित लिहिता यावे. अंक लिहितांना देखील असे होऊ शकते. परिणामी चुकून एखाद्या पालकाला त्याचे मुल dislexic आहे असे वाटू शकते .

मुलांसाठी लिहिणे सोपे करण्याच्या नादात नकळत ते अवघड होवून बसले आहे. हे सगळे जर  टाळायचे असेल तर सोपा मार्ग म्हणजे संपूर्ण अक्षर एकदम शिकवणे. जसे मला किंवा तुमच्या पैकी कित्येकांना लहानपणी शिकवले होते. अक्षर गिरवणे वारंवार गिरवणे हि पद्धत जरी ठोकळाछाप  वाटत असली तरी त्यात अशी चूक होण्याची शक्यता कमी!  कारण या पद्धतीत संपूर्ण  अक्षर हि एक  picture म्हणून  मुलांच्या लक्षात रहाते. शेवटी काय तर जुने ते सोने!!!!


शेवटपर्यंत खिळवून ठेवणारा ........कहानी

विद्या आणि फक्त विद्या बालन साठी म्हणून कहानी पहावा असं वाटलं. ट्रेलर मुळे उत्कंठा चांगलीच वाढली होती. अपेक्षेप्रमाणे शेवटची दोन तिकिटे मिळाली. पहिल्या रांगेत बसून पाहिलेला पहिला सिनेमा! खूप घाई करूनही सुरुवात हुकलीच. पण त्याने फार फरक पडला नाही. कारण सिनेमाची कथा थोडीफार ठावूक होती. थोडक्यात सांगायचं तर एका प्रेग्नंट बाईचा हरवलेल्या नवऱ्यासाठी चाललेला शोध. पण खरच तो हरवलेला असतो का? ती खरच प्रेग्नंट असते का? सिनेमा पाहत असतांना अनेक शक्याशक्यतांचा विचार मनात येत राहतो.
काही किरकोळ घोळ सोडले तर सिनेमाची पटकथा फार सशक्त आहे. प्रत्येक प्रसंगासाठी काहीतरी justification आहे. काळजीपूर्वक बघितलं नाही तर तुम्ही काही महत्वाचे दुवे गमावू शकता. सगळ्या कलाकारांनी उत्तम अभिनय केलाय. अगदी छोट्या भूमिकेसाठीही अनुभवी कलाकार निवडले आहेत. ह्या सगळ्या बाबी तर तुम्ही नोंदल्या असतीलच. पण मला इथे एक वेगळीच गोष्ट नमूद करावीशी वाटते. बऱ्याच हिंदी सिनेमांमध्ये एकतर  स्त्री कशी अबला नारी आहे, त्यात जर ती गर्भवती असेल तर ती आणखीच कमजोर कशी असते असेच स्त्रीचे चित्र रंगवले आहे किंवा ती अगदी कायद्याच रक्षण करणारी वगैरे दाखवालीये. (पहा: फुल बने अंगारे; रेखा, रजनीकांत ). थोडक्यात अधे-मध्ये काही असूच शकत नाही. गृहिणी किंवा सरळ पोलीस. 
या इथेच  कहानीचे वेगळेपण सुरु होते. ज्या कारणामुळे एखादी बाई अगदी अगतिक, लाचार असते, त्याच कारणाचा ती संरक्षक कवच म्हणून वापर करते. प्रत्येकाकडून सहानुभूती मिळवते. आणि प्रत्येकाचा स्वतःचे इप्सित  साधण्यासाठी खुबीने वापर सुद्धा करते. 

कुठल्याही suspense सिनेमाचा असतो तसा कहानीचा परमोच्च उत्कंठा बिंदू हा शेवटी येतो. यात विद्याने बाजी मारली आहे. एका क्षणी ती थकून हार पत्करलेल्या योद्ध्यासारखी वाटते. वाटत कि बास्स आता सगळे संपले. तिने खलनायकासमोर शरणागती पत्करलीये. 


पण क्षणार्धात ती चर्या बदलते आणि एखाद्या वाघिणीसारखी वाटते.

नुसत तिच्या डोळ्यात बघितलं तरी साक्षात  कळीकाळाला भीती वाटावी. हा बदल विद्याने अगदी सहज वठवलाय. या एका सीन मधे विद्याने ती खरी कोण आहे याची चुणूक दाखवली आहे. इथून पुढे आपण एका वेगळ्या शेवटाची अपेक्षा करतो आणि ती पूर्ण होते.

संपूर्ण सिनेमाभर लक्षात राहतो तो विद्याचा प्रसन्न आणि सहज वावर. हरवलेल्या पती साठी तिच्या जीवाची होणारी घालमेल, तगमग विद्या सहजी प्रेक्षकांपर्यंत  पोचवते.  विद्याचे डोळेच अभिनयाची अर्ध्याहून अधिक बाजू सांभाळतात असं म्हटलं तरी चालेल. तिला फारसं काही करावं लागत नाही.


पोस्ट टाकायला तसा बराच उशीर झालाय. आतापर्यंत बहुतांश जणांनी कहानी पाहिला देखील असेल. ज्यांनी तो नसेल पाहिला त्यांनी जरूर पहा. विद्याच्या डोळ्यांनी सादर केलेल्या भूमिकेसाठी पहा. (सिनेमाच्या  कास्ट मधे स्पेशली मेन्शन करायला हवय).

विद्याच्या पुढच्या सिनेमाकडून ढीगभर अपेक्षा निर्माण झाल्यात  ना?