Friday, December 8, 2017

मन करा रे प्रसन्न

मी नुकतीच कामावर रुजू झाले होते तेव्हाची गोष्ट . मला सुरुवातीला एका वरिष्ठ व्यक्तीला सहाय्यक म्हणून काम दिले होते. कामाच्या ओघात मी त्यांच्याकडून इतरही बऱ्याच गोष्टी शिकत होते. तेव्हा एकदा सहज बोलता बोलता ते म्हणाले : You will have neither friends nor foes here. म्हणजे त्यांना असं म्हणायचं होतं की माझी मी असेन. ना कुणाची फार मदत होईल ना कुणी अगदी वाकड्यात शिरेल. वय लहान होतं म्हणून म्हणा किंवा मी फारच आशावादी होते म्हणून म्हणा पण माझा यावर फारसा विश्वास बसला नाही. पण आता एकाच ठिकाणी इतकी वर्षे घालवल्यावर ते वाक्य बऱ्यापैकी खरं होतं असं वाटू लागलंय. मला आपलं बाळबोधपणे असं वाटत होतं की कदाचित शत्रू निर्माण न करण्यात मला यश येणार नाही पण  मित्र-मैत्रिणी मात्र मी नक्की  मिळवेन. हा आशावाद खोटाच ठरला. असं का झालं असावं असा विचार केल्यानंतर काही गोष्टी वेगळ्याच दिसायला लागल्या.  एक नवीनच थेअरी इथे लागू होतेय असं वाटलं. मी त्याला गूळ - मुंगळा थेअरी म्हणते. काही लोकांना आपण गूळ आहोत याची खात्री असते. त्यामुळे कुणीही कसल्या कामासाठी मदत मागितली किंवा सोबत कामाचा प्रस्ताव दिला तर त्यांना ती व्यक्ती मुंगळा आहे असं वाटतं आणि मग ते मदत करणं टाळतात. याउलट काहींना आपण मुंगळा आहोत हे पक्कं ठाऊक असतं आणि मदत मागायला येणाराही मुंगळाच आहे हा यांचा भ्रम असतो. मग मुंगळ्याची मदत करून काय फायदा असा हिशोब करून ते गुळाचा शोध घेत राहतात. या सगळ्या गूळ - मुंगळ्यांच्या नादी लागण्यापेक्षा एकटेच प्रयत्न सुरु ठेवणं अधिक चांगलं!
या अशा विचारांच्या जंजाळात अडकल्यावर कधी कधी फार वाईट वाटतं. निराशा दाटून येते. मग मात्र मी प्रयत्नपूर्वक त्या निराशेच्या गर्तेतून बाहेर येण्यासाठी उपाय योजते. संत-वाङ्मय वाचणं हा त्यापैकी एक. तुकारामांच्या पुढील पंक्ती खूप प्रेरणादायी वाटतात.

मन करा रे प्रसन्न ! सर्व सिद्धीचे कारण !!
मोक्ष अथवा बंधन ! सुख समाधान इच्छा ते !! 


कुणाला माझ्याबद्दल काय वाटतं  याचा इतका विचार करण्यापेक्षा आजचा दिवस खऱ्या-खुऱ्या आनंदात कसा घालवता येईल याचा जास्त विचार केला असता तर कदाचित निराशा आलीच नसती. असो. सध्या परमहंस योगानंदांचं 'How to be happy all the time' हे पुस्तक वाचणं सुरु केलंय. काहीतरी चांगलं शिकायला मिळेल याची खात्री बाळगून. 

No comments:

Post a Comment