Thursday, August 2, 2012

बघितलंत आम्ही काय करू शकतो ते?

काल  संध्याकाळी अचानक  मोबाईल  वाजायला लागला. वाटलं  असेल कुणाचा तरी फोन! फोन घेण्याआधी हे कुठे ठावूक होते कि पुढचे काही तास प्रचंड टेन्शन मध्ये जाणारेत? कळलं असं कि पुण्यात तीन ठिकाणी स्फोट झालेत. बातमीच हादरवून टाकणारी होती. त्यात नेमकं  कम नशिबाने टीवी सुद्धा बंद होता. फोनवरच आणखी माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. स्फोट जिथे झाले होते त्या भागात कुणी आप्त अथवा परिचित नाहीयेत ना  याची खातरजमा केली. तर नेमकी भाची गरवारे कॉलेज जवळ अडकलेली! अखेरीस थोड्या वेळात ती देखील घरी सुखरूप पोचली. पण विचार आलाच कि हे कसं  होऊ शकतं? कारण आम्ही पुणेकर स्वतःला फार सेफ समजत होतो कालपर्यंत. उमगत नव्हतं कि नेमकं काय करावं? भाची सुखरूप पोचली म्हणून आनंद मानावा का कि आता आपण सगळेच एका मोठया संकटात सापडलोय म्हणून चिंता करावी. कारण जे आज घडलय ते पुन्हा पुन्हा घडू शकेल. मुंबैकारांप्रमाणे आता पुणेकर देखील रोज घरी पोचला कि हुश्य करायला लागेल कि चला बुवा आज तरी कुठे स्फोट झाला नाही! दिवसभर नवरा/ बायको एकमेकांना फोन करत राहतील; विचारतील कि जेवलात का? पण खरा उद्देश असेल कि बाबारे व्यवस्थित आहेस ना. ह्या सगळ्या गोष्टी त्या तासा दोन तासात डोक्यात येवून गेल्या.

मला तर असं  अजिबात वाटत नाही कि कुणी तरी निव्वळ खोडी काढण्यासाठी असं  काही करेल. झालेले स्फोट फारसे गंभीर नसले तरी एकंदरीत सगळ्या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहण्याची तीव्र गरज आहे. जर ऐन सणासुदीच्या काळात अश्या मोक्याच्या जागा टार्गेट होऊ शकतात तर खरे स्फोट घडवून आणण काय कठीण आहे? आपण असे निर्धास्त कसे राहू शकतो? जर स्फोट खरोखर तीव्र असते तर नुकसानाची कल्पनाच न केलेली बरी. जंगली महाराज रस्ता, देना बँक, मक्डोनाल्ड इ. सगळी ठिकाणे अत्यंत वर्दळीची आहेत. या वेळेला वाचलो पण भविष्यात काय वाढून ठेवलंय हे कुणाला ठावूक! अश्या परीस्थितीत आपण सगळ्यांनीच अतिशय सजग (विशेषतः गर्दीच्या ठिकाणी) राहणे आवश्यक आहे. बाकी काय, इतकच म्हणायचं कि आयुष्याचा काही भरवसा नाही. 

3 comments:

  1. अगदी खरं आहे! स्फोटांची तीव्रता जरी कमी असली तरीही दहशत निर्माण व्हायची ती होतेच ना. मूळ उद्देश तरी तोच असतो या सगळ्या प्रकारांमागाचा. पुणं आता सेफ राहिले नाहीये असं वाटू लागलं आहे आता..

    ReplyDelete
  2. आता आजची बातमी वाचल्यावर आणखीनच tension घ्यायला हवंय....
    Post वाचून "Wednesday" आठवला...

    ReplyDelete
    Replies
    1. खरय आजची बातमी टेन्शन देणारीच आहे . हो, वेनस्डे चा प्रभाव आहे पोस्त वर!

      Delete