Saturday, February 11, 2012

शब्देविण संवादिजे........

निमित्त होत घसा खराब व्हायचं! त्यातून बरेच साक्षात्कार झाले. घसा इतका बिघडला कि बोलणच बंद झाल. मग सुरु झाल्या खाणा-खुणा. घरातले सगळे मला चांगलेच ओळखून असल्याने त्यांना मला काय म्हणायचे आहे ते लगेच कळत होते. त्यामुळे कम्युनिकेशनचा त्रास झाला नाही. पण बोलण कमी झाल्याने आपोआपच मन अंतर्मुख झाले. आणि मी परिस्थिती एन्जोय करायला लागले. गरज असेल त्याच्याशीच बोलायचे इतरांसाठी कारण होतेच कि घसा बसलाय ते!
.......................
..........................

मनातल्या मनात बोलणे वाढले. शांतपणे विचार करायला लागले कि नेहेमी मला असं शांत बसायला का नाही जमत?  का सगळ्या परिस्थितीचा मी तटस्थपणे विचार नाही करू शकत? हळू हळू जाणवायला लागले कि कदाचित मनाशी संवाद अपुरा पडतोय. कदाचित मनाशी संवाद साधायला सगळ्या बाह्य गोष्टींपासून लांब जावे लागते. अनावश्यक बोलणे हे त्यापैकी एक.
..........................................
..............................................
असच असेल का? एखाद्याशी आपले संबंध बिघडायला हीच अनावश्यक बडबड कारणीभूत असते. किती छान होईल न मग? जर नको असेल तेव्हा आपल्याला बोलताच नाही आले तर? कुठे थांबावं हे जर प्रत्येकाला कळलं तर  बऱ्याचश्या समस्या सुटतील. माणसाला नेमकं काय हवंय ते उमगायला लागेल. तसं म्हणावं तर बऱ्याच जणांना ते उमगलेलं असतं पण वळत नसतं. मग सुरु होते मृगजळामागे धावणे. .............आज काय तर घर हवंय, उद्या आणखी एखाद घर झालं तर बर. महत्वाकांक्षा असू नये असं मला सुचवायचं नाहीये. पण किती आणि कशासाठी याचा जरूर विचार करावा. 

थोडी प्रबोधनपर झालीये पोस्ट! इतरांना कमी स्वतःला जास्त उद्देशून लिहिलंय. loud thinking का काय म्हणतात न  तेच! 


Tuesday, January 31, 2012

बालपणीच्या गमती-जमती-2

          मार्च महिना लागला कि सगळ्यांना वेध लागायचे ते सुट्ट्या कधी सुरू होतात त्याचे. सगळी भावंडे मग एकत्र जमायचो. बाहेरगावी असलेली चुलत भावंडे देखील यायची. रोज दुपारी वेगवेगळे खेळ रंगायचे. जोडीला आम्हा सगळ्याची स्थानिक मित्र-मंडळी देखील असायचीच. मोठी भावंडे क्रिकेट खेळायची तर छोट्यांना बैठे खेळ आवडायचे.

          आमच्या गल्लीतल्या एका मावशींना मात्र आमचे असे दुपारचे उंडारणे अजिबात पसंत नव्हते. उघड विरोध करण्या इतपत त्यांच्यात हिम्मत नसावी. आमच्या वरचा राग मग आमच्या वस्तूंवर निघत असे. क्रिकेट खेळताना ball जर चुकूनही त्यांच्या घरात शिरला तर त्याचे दोन तुकडे होवूनच परत मिळत असे. या मावशींचे नाव बसंती होते. एकदा दादाने त्यांना अद्दल घडवायची असे ठरवले. त्याने गल्लीतल्या प्रत्येक छोट्या मुलाला गाठून एकच प्रश्न विचारला. प्रश्न विचारताना तो हि काळजी घ्यायचा कि त्याचे उत्तर मावशींना ऐकू आले पाहिजे. प्रश्न असायचा: शोले या सिनेमात हेमा मालिनीचे नाव काय होते? उत्तर मोट्ठ्याने दिले तर एक chocklate मिळेल. ज्याने ज्याने उत्तर दिले त्याला chocklate मिळाले. मावशी मात्र त्यानंतर सहसा क्रिकेट खेळणाऱ्या मुलांच्या वाट्याला गेल्या नाहीत.  

          एका दुपारी क्रिकेटचा खेळ रंगात आलेला होता..........
मोट्ठे तिन्ही दादा आणि त्यांचे चार-पाच मित्र क्रिकेट खेळत होते. खेळ छोट्याश्या गल्लीत सुरु होता. धाकट्या दादाची batting सुरु होती. खेळ अगदी अटी- तटीला आलेला होता. दादाच्या टीमला थोड्याच धावांची गरज होती. म्हणून दादाने अगदी दे घुमाके स्टाइल मध्ये bat घुमवली. ती नेमकी बाजूने जाणाऱ्या एका आजोबांना लागली. झालं! सगळा गोंधळच मग! आजोबांना फारसे लागलेले नव्हते. पण आजोबा थोडे तापट डोक्याचे असावेत. त्यांनी दादासकट सगळ्या मुलांना शिव्या घालायला सुरुवात केली. थोडा वेळ कुणीही काही बोलले नाही. तरीसुद्धा आजोबा थांबत नाहीत हे बघून टीम मधल्या एका मोठ्या मुलाने आरडा-ओरडा सुरु केला. त्याने आजोबांना आणखी चेव सुटला. मग ते असे सुटले कि कुणी त्यांना आवरू शकत नव्हते. सगळी टीम विरुद्ध ते आजोबा असा शाब्दिक वाद बराच वेळ रंगला. शेवटी गल्लीतल्याच एका माणसाने दोन्ही बाजूंना शांत केले.  चला झाली एकदाची शांतता असे म्हणून हुश्य करावे तर कळले कि ते आजोबा गल्लीत एका मुलीला बघायला आले होते. त्या मुलीचा भाऊ सुद्धा टीम मध्ये होता!!! आजोबा इतके रागात होते कि त्यांना हे कळल्यावर त्यांनी मुलीला बघायलाच नकार दिला. पण थोरामोठ्यांनी समजावल्यावर ते तयार झाले आणि चहा-पोह्याचा कार्यक्रम पार पडला. क्रिकेटचे नन्तर (त्यादिवसा पुरते) कुणी नावही काढले नाही हे वेगळे सांगायला नको. 

Monday, January 2, 2012

Happy New Year, 2012!!! नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!


हे नवीन वर्ष सर्व वाचकांना भरभराटिचे आणि आरोग्यपूर्ण जावो.

Wednesday, December 21, 2011

बालपणीच्या गमती-जमती- 1

          मी एकत्र कुटुंबपद्धती असलेल्या घरात वाढले. सख्खी-चुलत मिळून आम्ही पाच भावंडे (दोन मुली, तीन मुले) एकत्र राहत होतो. प्रत्येकाचा स्वभाव निराळा. त्यातून भांडणे, वाद आणि खोड्या या उद्भवणारच! लहान भावंडांना आजीकडून full protection मिळायचे. त्यांनी कितीही खोड्या केल्या तरी आजी पाठीशी घालणार हे गृहीतच धरलेले असायचे. मग अश्या वेळेस निरनिराळे मार्ग शोधले जायचे कि जेणे करून आजीचा ओरडा हि खावा लागू नये आणि खोड्या काढणाऱ्या भावंडाला अद्दल देखील घडली पाहिजे.

           आमचे घर म्हणजे एक लांबलचक आगगाडीचा डबाच! एका मागोमाग एक अश्या एकूण पाच खोल्या होत्या. पहिले kitchen, नंतर एकमेकाला  लागून असलेल्या दोन बेडरूम्स, त्यानंतर बाथरूम कम dry बाल्कनी आणि शेवटी बेडरूम + बैठक. बाथरूम हे घराच्या अगदी मध्यात होते. घराचे छत पत्र्याचे व बऱ्यापैकी उंच असल्याने, बाथरूम मध्ये विजेच्या दिव्याशिवाय अजिबात दिसत नसे.  याच गोष्टीचा फायदा घेतला जायचा. ज्या लहान भावंडाची जिरवायची आहे, तो आंघोळीला गेला कि त्याचा दादा बाहेरून दिवा बंद करत असे. त्याने कितीही आरडा-ओरडा केला तरी आवाज पटकन किचन पर्यंत किंवा बैठकी पर्यंत जायचा नाही. मग बिचाऱ्याला तशीच कशीबशी आंघोळ उरकून बाहेर यावे लागे. तोवर दादा तिथून पसार झालेला असे. मग काय? सगळेच संशयित! सगळ्या मोठ्यांना मग बोलणी खावी लागत. पण तोवर सगळ्यांनी धाकट्याची फजिती भरपूर एन्जोय केलेली असायची. हा परिपाठ बरेच दिवस चालू होता. शेवटी आमच्या रोजच्या कटकटींना वैतागून काकांनी त्यावर एक जालीम उपाय शोधला. त्यांनी चक्क एक extra switch बाथरूमच्या आत बसवले. त्याची रचनाच अशी होती कि बाहेरून  switch बंद केले तरी आतले switch on असले तर दिवा चालू राहायचा.  अखेरीस दिव्याचा नाद सगळ्यांनीच सोडला!!!

आणखी काही गमती-जमती पुढच्या post मध्ये लिहीन.




Monday, November 7, 2011

देऊळ

फार अपेक्षा ठेवून सिनेमा बघायला गेलो की कधी कधी निराशा होते असं म्हणतात. पण देऊळच्या बाबतीत मात्र असे नाही. नाना पाटेकर,दिलीप प्रभावळकर, मोहन आगाशे, गिरीश कुलकर्णी, नसीरुद्दीन शाह अशी मोठ्ठी नावं ऐकली की अपेक्षा उंचावतात. देऊळ हा सिनेमा तुमच्या एका चांगल्या मूवी कडून असलेल्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करतो. 
संपूर्ण सिनेमात एकच  पात्र सर्वाधिक प्रभावी  ठरते ते म्हणजे गिरीश कुलकर्णी यांनी रंगवलेले केशा.
नावाप्रमाणे सिनेमाची कथा एका देवळाभोवती फिरते. गावातल्या एका साध्या तरुणाला, केशाला, गावाबाहेरच्या डोंगरावरील झाडावर दत्त प्रकटलेत असे स्वप्न पडते. गावात सगळीकडे हे कळल्यानंतर, स्थानिक पुढारी हॉस्पिटलाऐवजी तेथे देऊळ बांधतात. देऊळची  त्याप्रमाणे सर्वत्र प्रसिद्धी केली जाते. त्यातून गावाला आणि गावकर्यांना आर्थिक लाभ सुरू होतो. गावात सर्वत्र बदल घडून येतात.  पण यातून कुठेही भक्तित वाढ होत नाही तर फक्त पैशात वाढ होते. देवाचा देखील अखेरीस फक्त व्यवसाय होतो. हे सगळे केशाला जाणवू लागते आणि तो खूप दुखावतो. शेवटी ज्या गायीच्या निमित्ताने त्याला दत्ताचे दर्शन झाले ती देखील मरणासन्न असतांना तिची काळजी घेतली जात नाही. केशा या सगळ्याला वैतागून एक  अनपेक्षित कृती करतो. ही झाली ढोबळमानाने सिनेमाची पटकथा.
उत्तम आणि भूमिकेला न्याय देऊ शकणार्‍या कलाकारांची निवड हे देऊळ चे सर्वात मोठे बलस्थान. सगळ्या कलाकारांनी आपापल्या भूमिका अगदी उत्तम वठविल्या आहेत.
गिरीश कुलकर्णिंचा कुठलाही सिनेमा मी या आधी पाहिलेला नाही. या सिनेमातला त्यांचा अभिनय अत्यंत उत्तम झाला आहे. गावाकडील भाषेचा ढन्ग त्यांनी लीलया उचलला आहे. केशाचा भाबडेपणा, त्याचं देव्भोळ  असणं, त्याचा दत्ताचा साक्षात्कार झाल्या नंतरचा आनंद हे सगळं काही गिरीश यांनी फार छान रित्या प्रेक्षकांपर्यंत पोचवले आहे. शेवटी केशाची  झालेली घालमेल, घुसमट ही तुमच्या आमच्या मनाला अस्वस्थ करते.
हा सिनेमा कुठलाही मेसेज तुम्हाला देत नाही. म्हणजे अशी अशी परिस्थिती असेल तर असं असं वागावं असे काहीही सूचीत केलेले नाही. मात्र डोळे उघडे ठेवून बघायला सांगितले आहे. आम्ही आपले मंदिर दिसले की डोके टेकवतो त्यापलीकडे फारसा विचार करत नाही. त्यामागे एवढी पैशाची उलाढाल असेल असा विचार देखील कधी कुणी केलेला नसतो. आपण सुद्धा किती तरी प्रती शिर्डी, प्रती बालाजी अश्या मंदिरात गेला असाल. पण त्या ठिकाणी खरेच तितके पावित्र्य आहे का याचा कुठेतरी विचार व्हायला हवा.   आपण देवळात का जातो? मनाला शांती मिळावी म्हणून, काही हवं असतं म्हणून अशी प्रत्येकाची कारणे वेगळी वेगळी असतात.
भौतिक सुखांच्या मागे किती धावायाचे आणि नेमका कशासाठी अट्टहास करायचा, का करायचा? ह्या सगळ्या प्रश्नांवर विचार करायला आपण भाग पडतो. "फोडा दत्त नाम टाहो" या गाण्यात आपल्या जीवन वर्तुळाचा धार्मिकतेशी कसा छेद जातो ते कळते.

काही अनावश्यक गोष्टी (आइटम सॉँग आणि नको तितके वास्तव दर्शन) वगळल्यास देऊळ हा चित्रपट अत्यंत उत्तम बनलाय. डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा आहे हे नक्की. अवश्य बघा.