Thursday, August 16, 2012

Autobiography of a Yogi अर्थात योगी कथामृत - 1


नववीत असतांना पहिल्यांदा योगी कथामृत हे पुस्तक हातात पडले. मी अगदी झपाटून गेल्यासारखे वाचून काढले. त्यातला काही भाग अर्थातच त्या वयात फारसा समजला नाही. पण एकंदरीत पुस्तक फार आवडले.
या पुस्तकात परमहंस योगानंदांनी त्यांचे आयुष्य अत्यंत प्रामाणिकपणे वाचकांसमोर मांडले आहे. त्यांच्या बालपणापासून तर अमेरिकेतल्या वास्तव्यापर्यंतचा काळ यात समाविष्ट होतो. लहानपणापासून योगीजींना असलेली आध्यात्मिक ओढ त्यांना काय काय करायला लावते हे सगळे सुरुवातीच्या काही प्रकरणांमध्ये येते. गुरूच्या शोधासाठी योगीजींनी घेतलेली धडपड मनाला स्पर्शून जाते. अंतर्बाह्य भिनलेले वैराग्य आणि मार्गदर्शक गुरूचा अभाव ह्या विरोधाभासी परिस्थितीत योगीजींना त्यांच्या आईचा मोठा आधार असतो. परंतु ती देखील त्यांच्या वयाच्या नवव्या वर्षी निर्वतते. नऊ हे खरे तर फार लहान वय. पण त्या वयात देखील योगीजींना असलेली समज थक्क करते. सतत अति उच्च दर्जाचे आध्यात्मिक अनुभव येत असताना त्यांना गुरूच्या मार्गदर्शनाचा फार अभाव जाणवत असतो. अखेरीस काही वर्षांनी त्यांना श्री युक्तेश्वर गिरी यांच्या सारखे महान गुरु लाभतात आणि त्यांची आध्यात्मिक वाटचाल सुकर होते.
या पुस्तकात बऱ्याच निरनिराळ्या स्तरावरील चमत्कारांचा उल्लेख आढळतो. योगीजींनी केवळ असा-असा चमत्कार झाला एवढेच सांगितले नसून त्या मागची कारण मीमांसा सुद्धा स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलाय. उदाहरणादाखल त्यातल्या कोबीच्या चोरीबद्दल बोलता येईल. योगिजी गुरुंसमवेत त्यांच्या सेरामपुर येथील आश्रमात राहत असतानाची हि घटना आहे. योगीजींनी आश्रमाजवळील जागेत एकदा फुलकोबी पेरली. बरीच मेहनत घेतल्यानंतर त्यांना पाच कोबी मिळाल्या. त्या त्यांनी गुरुचरणी अर्पण केल्या. गुरूंच्या सूचनेप्रमाणे त्यांनी त्या स्वतःच्या खोलीत पलंगाखाली एका टोपलीत नीट झाकून ठेवल्या. या नन्तर आश्रमातील सगळी मंडळी फिरावयास निघाली. थोडे अन्तर चालून गेल्या नंतर अचानक श्री युक्तेश्वरजीनि आपल्या शिष्यांना आश्रमाचे मागील दार बंद केले होते का हे विचारले. हि जबाबदारी योगीजींवर सोपवलेली होती आणि ती पार पाडायचे ते विसरले होते. हे लक्षात आल्या नंतर युक्तेश्वरजी म्हणाले कि याची शिक्षा म्हणून तुझ्या कोबितली एक कमी होईल आणि एवढे म्हणून त्यांनी आश्रमाकडे परतायला सुरुवात केली. आश्रम दृष्टीपथात आल्यानंतर सगळे बघतात तर काय एक वेडसर इसम कोबी हातात नाचवत आश्रमाच्या मागील दiराने बाहेर पडत होता. सगळे आश्रमात पोचेस्तोवर तो नाहीसा झालेला होता. यावर श्री युक्तेश्वरजींचे म्हणणे असे होते कि ज्याला उच्च दर्जाचे आध्यात्मिक अनुभव येतात अशाने हि आध्यात्मिक कार्य हि भौतिक जीवनातील काम टाळण्यासाठीची सबब म्हणून सांगू नये. या चमत्काराचे थोडक्यात स्पष्टीकरण द्यायचे झाल्यास ते असे देता येईल:प्रत्येक मानवी शरीर जणू रेडिओ आहे. असा रेडिओ ज्याला इच्छाशक्तीद्वारे उर्जा मिळते आणि ज्यातून वेगवेगळ्या इच्छारुपी लहरी बाहेर पडत असतात. श्री युक्तेश्वर स्वतः जणू काही शक्तिशाली रेडिओ स्टेशन आहेत. असे स्टेशन ज्याला हजारो इच्छारुपी लहरींमधून नेमकी हवी ती नेमकेपणे उचलता येते. आणि म्हणून त्यांनी त्या वेडसर माणसाची कोबी हवी अशी इच्छा ओळखून त्याला आश्रमाकडे जाण्यासाठी प्रेरित केले.

या छोट्याश्या प्रसंगातून बरेच काही शिकण्यासारखे आहे. आध्यात्मिक जीवनात तुम्ही कितीही प्रगती केलीत तरी तुमच्या भौतिक आयुष्यातील कर्तव्यापासून तुमची सुटका नाही. खरा गुरु आपल्या शिष्याला घडवण्यासाठी किती धडपडत असतो हे यातून दिसते. शिष्याच्या अंगी थोडीदेखील उणीव असू नये, तो एक उत्तम मानव व्हावा असेच त्यांना वाटते.

या पुस्तकाबद्दल आणखीही बरेच काही लिहिण्याजोगे आहे. पुढील post मध्ये बघूया.
टीप: वरील पुस्तक पुढील लिंकवर online वाचता येते.

3 comments:

  1. पुस्तक वाचायची उत्सुकता वाढवणारी पोस्ट आहे. आता वाचायला हवं पुस्तक...

    ReplyDelete
  2. Good one.
    Unfortunately ,Nowadays Dispassion is very much wrongly received.

    ReplyDelete