Friday, August 10, 2012

तुमच्या आयुष्यातील सर्वाधिक महत्वाची व्यक्ती कोण?


वरील प्रश्नाचं माझ्याकडे एका शब्दात उत्तर आहे. कामवाली बाई! हो, सध्या तरी माझ्यासाठी तीच सर्वात महत्वाची आहे. तिच्या शिवाय दैनंदिन  जीवनाची चक्र सुरळीत फिरणं निव्वळ मुश्कील. प्रत्यक्ष परमेश्वराची देखील इतकी वाट पाहिली जात नसेल जितकी हिची पाहिली जाते. सकाळचे साडे नऊ वाजले कि मनात धाकधूक सुरु होते. आज madam येणार कि नाही? वेळेवर येतील न? विचार करून करून वैताग यायला लागतो. बरं, फोन करूनही बया फोन घेईलच याचा काही भरवसा नाही. दांडी मारण्यासाठी यांच्या कडे अनंत कारण असतात. आज काय तर मुलाला बर नाही, उद्या काय तर घरात पावसाच पाणी शिरलं, अचानक गावाला जावं लागलं इ. इ. 
माझ्या स्वयंपाकवाल्या बाईची काय खुबी सांगावी? जर ती नेहमीच्या वेळेवर आली नाही आणि मी फोन केलाच तर तिचे उत्तर असते: " मी उदयाला येते बगा ताय!" मी मनातल्या मनात चरफडते कि बाई गं उद्याचं सोड, आजच काय? जर स्पष्टच विचारले तर हजारो कारण असलेल्या पोतडीमधून एखादे काढून माझ्यावर फेकते. घे! तुला कारण हवंय न? असा आविर्भाव असतो. दुसऱ्या दिवशी जर उगवलीच तर आल्या-आल्या भरपूर गोड बोलणार हे नक्की. चुकून आदल्या दिवसाबद्दल जर विचारलंच तर म्हणणार :"ते काय असतंय ताई अवो सुखदुख सगळ्यांना असतंय बगा. कुन्नी सुटला नैवो त्यातून! तुमी नै का सुट्टी गेता? तवा मलाबी सुट्टी लागते वो!"

पगार वाढ हवी आहे हे सांगण्याची पद्धत तर तुम्ही यांच्याकडून शिकायला हवी. सरळ सरळ कधीही म्हणणार नाही कि मला पगार वाढवून हवाय. त्याऐवजी तिला कसा इतरांकडे जास्त पगार मिळतो ते ऐकवणार. अर्थात पगार जास्त म्हणजे तिथे काम देखील जास्तच असते.पण ते सांगायचे मात्र  कटाक्षाने टाळणार. अश्या वेळी मला प्रचंड राग येतो. कारण काम ठरवलं असतांना हि बया काहीही बोललेली नसते. 
घरात कुणी पाहुणे आले कि मग तर विचारायलाच नको. मला कोपऱ्यात गाठून सरळ चौकश्या सुरु: "कदी जानार ताय पावूने? तुमाला लय काम पडत असल ना?" दाखवणार  असं कि हिला माझ्याबद्दल फार काळजी वाटतेय, पण प्रत्यक्षात मात्र स्वतःच्या कामाची फिकीर असते! 

या बायका- बायकांमध्ये हि अनेक तऱ्हा असतात. स्वयंपाक करणारी बाई भांडी-धुणी करणाऱ्या बाई पेक्षा स्वतःला उच्च समजते.  स्वयंपाक करायला कशी जास्त अक्कल लागते हे दाखवायचा सतत प्रयत्न असतो. मला कसं स्वयंपाक उत्तम करणं जमत हे स्व-गुणगान एखादी जरी चूक दाखवली कि सुरु होतं. 
असो! हरी अनंत, हरी कथा अनंता च्या धर्तीवर बाई अनंत, तिच्या कथा अनंता!! त्यामुळे to be continued.......

2 comments:

  1. अडला हरी आणि...
    छान खुसखुशीत झालीये post

    ReplyDelete
    Replies
    1. बाईस्य कथा रम्य:! हेच खरं!

      Delete